Home बड़ी खबरें *कापूस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी पंचसूत्री अवलंबावी* – *आर टी जाधव*

*कापूस उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी पंचसूत्री अवलंबावी* – *आर टी जाधव*

174
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : कापूस पिकाच्या शाश्वत उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी योग्य बियाणांची निवड, सघन लागवड पध्दत, पीकवाढ नियंत्रकाचा वापर, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन ही पंचसूत्री अवलंबावी, असे प्रतिपादन वरोरा विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. जाधव यांनी येथे केले. वरोरा उपविभागीय कृषी कार्यालय, तालुका कृषी कार्यालय, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) तथा सह आयोजक पारस ऍग्रो इंडस्ट्रीज,याच्या संयुक्त विद्यमाने स्मार्ट कॉटन प्रकल्पांतर्गत ३० व ३१ में रोजी पारस अग्रो इंडस्ट्रीज, मार्डा रोड, वरोरा येथे शेतकरी गट प्रमुखांचे कापूस लागवड पूर्व प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते त्यावेळी अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. एस. आर. इमडे, डॉ.पी. एस. राखुंडे, डॉ. एम. जी. जोगी, कृषी पर्यवेक्षक एम. एस. वरभे उपस्थित होते.
जाधव पुढे म्हणाले की, कापूस पिकाच्या शाश्वत उत्पादनासाठी जमिनीचे आरोग्य व सेंद्रिय कर्ब वाढविण्याची आवश्यकता आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एकजिनसी व स्वच्छ कापसाचे उत्पादन करून आपल्या आर्थिक मिळकतीत भर घालावी, असे त्यांनी आवाहन केले. दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात डॉ. इमडे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कापूस लागवडीचे आधुनिक तंत्रज्ञान सविस्तर समजावून सांगितले. डॉ.राखुंडे यांनी कापूस पिकावरील विविध कीड व रोग व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. डॉ.जोगी यांनी जीवाणू खते व जीवाणूंचा कापूस उत्पादनात परिणामकारक वापर यावर विस्तृत माहिती दिली. याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक वरभे, महाकॉट प्रतिनिधी पी.एच.डोंगरे, कोंढाळाचे प्रगतशील शेतकरी भानूदास बोधाने, नंदोरी बु. येथील प्रगतिशील शेतकरी सुनील उमरे यांची समयोचित भाषणे झालीत. तसेच प्रगतशील शेतकरी यांनी प्रत्यक्ष प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिके घेऊन सादरीकरण केले.
प्रास्ताविकात तालुका कृषी अधिकारी व्ही.आर. प्रकाश यांनी सांगितले की, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत स्मार्ट कॉटन हा उपक्रम जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने महाराष्ट्रात सात वर्षाकरता राबविण्यात येत आहे. या वर्षी महाराष्ट्रातील बारा जिल्ह्याची यात निवड करण्यात आली असून त्यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, चिमूर व गोंडपिपरी या चार तालुक्यांचा समावेश आहे. वरोरा तालुक्यातील पंधरा गावातील सुमारे शंभर शेतकरी एक ते दोन गटात विभागून प्रत्येकी किमान दोन एकर क्षेत्रावर एकजिनसी म्हणजे धाग्याची समान लांबी असणारे व कापसाची इतर समान गुणधर्म असलेल्या कापसाच्या संकरित किंवा सरळ वाणांची निवड करून ‘ एक गाव एक वाण ‘ अशी कापसाची लागवड करतील. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक शेतकऱ्यांना त्रिस्तरीय करार करावयाचा आहे. ह्यात शेतकरी, कापूस उत्पादक पणन महासंघ (महाकॉट) व त्यांनी निवड केलेली पारस ऍग्रो इंडस्ट्रीज यांच्यात होणार आहे .या कराराप्रमाणे शेतकरी गट त्यांचा उत्पादित कापूस जिनींग मिल पर्यंत पोहोचणार असून जिनींगमिल मध्ये त्या कापसावर प्रक्रिया करून कापूस रुईच्या गाठी तयार करण्यात येतील. महाकॉट ही यंत्रणा या गाठीची राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावर लिलावाद्वारे विक्री करतील. या लिलावातून मिळणारा पैसा जिनिंग शुल्क, विमा, वाहतूक व हाताळणी खर्च इत्यादी खर्च वजा जाता शेतकरी गटामार्फत शेतकऱ्यांचे खात्यात थेट जमा करण्यात येईल.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहा. तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा) मीनल आसेकर यांनी तर आभारप्रदर्शन जिल्हा समन्वयक (आत्मा) विशाल घागी यांनी केले.
प्रशिक्षण कार्यक्रमात वरोरा तालुक्यातील अनेक कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी अमोल मुथा सह वरोरा, शेगांव, टेमुर्डा येथील मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहायक आदींनी परिश्रम घेतले.