Home चंद्रपूर  *वरोऱ्याची प्रगती कायरकर शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात.*

*वरोऱ्याची प्रगती कायरकर शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात.*

114

*दोन राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडूंचा पोलीस दलात समावेश*

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : लोक शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या अनेक मुला- मुलींनी व्हॉलीबॉल स्पर्धेत देशाचे नेतृत्व करून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीमुळे वरोरा शहराचा नावलौकिक वाढविला आहे. यावेळी लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रगती ज्ञानेश्वर कायरकर हिची भोपाळ येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य मुलींच्या संघात निवड झाल्याने वरोऱ्याच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा खोवल्या गेला आहे.
मागील अनेक दशकांपासून व्हॉलीबॉल खेळात वरोरा येथील लोक शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा दबदबा राहिला आहे. राष्ट्रीय पातळीवर नेत्रदीपक यश संपादन करणारी लोक शिक्षण संस्था, वरोडा व वरोरा स्पोर्ट्स फाउंडेशन वरोराचे राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू अनिकेत पुरुषोत्तम चौधरी आणि प्रशिल विजय हजारे यांची क्रीडा क्षेत्रातून चंद्रपूर पोलीस दलात शिपाई पदी निवड झालेली आहे. सर्व खेळाडूंच्या निवडीबद्दल वरोरा शहरात कौतुक करण्यात येत आहे. खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय लोकशिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील, उपाध्यक्ष श्रीकृष्ण घड्याळपाटील, कार्यवाह दुष्यंत देशपांडे, विश्वनाथ जोशी, वरोरा स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष गजानन जीवतोडे, सुनील बांगडे, लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य राखे, लोकमान्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्मिता धोपटे, इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक संजय आंबुलकर, नवले, क्रीडा शिक्षक अनिल घुबडे, प्राध्यापक उत्तम देऊळकर, मिलिंद कडवे यांना दिले. निवड झालेल्या खेळाडूंचे डब्ल्यू.एस. एफ.चे वरिष्ठ खेळाडू मुकुल कातगडे, राष्ट्रीय पंच हेमंत घिवे, संदीप उपरे यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.