Home चंद्रपूर  *देशविकासात कामगारांचे योगदान चिरंतन स्मरणात राहणारे* – *छोटूभाई शेख*

*देशविकासात कामगारांचे योगदान चिरंतन स्मरणात राहणारे* – *छोटूभाई शेख*

71

*वरोरा येथे कामगार व महाराष्ट्र दिन साजरा*

*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : ” देशाच्या जडणघडणीत कामगारांचा महत्त्वाचा वाटा असून त्यांचे योगदान चिरंतन स्मरणात राहणारे आहे “, असे परखड प्रतिपादन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कामगार सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच असंघटित कामगार संघटनेच्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचे अध्यक्ष जैरुद्दीन उर्फ छोटुभाई शेख यांनी केले. समाजभान जपणाऱ्या शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने येथील कामगार चौकात कामगार दिन व महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष गजाननराव मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते कैलास तडस, त्रिशूल घाटे, व्यापारी दुग्गड, शब्बीर भाई शेख, संदीप वैद्य व इतर मान्यवर उपस्थित होते.
छोटूभाई शेख पुढे म्हणाले की, प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे आजही हजारो कामगार घरकुलसोबतच विविध शासकीय योजनांपासून वंचित आहेत. सर्वसामान्य कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हा स्तरावर अभियान राबवून काम करण्याची गरज आहे. कामगारांना त्यांचे घटनादत्त अधिकार मिळवून देण्यासाठी तसेच विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्याचे कामगार मंत्री व कामगार आयुक्त यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
याप्रसंगी छोटूभाई शेख व इतर मान्यवरांच्या हस्ते सर्व कामगारांना मिठाई भरविण्यात आली तसेच पुष्पगुच्छ देऊन कामगारांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
सुरुवातीला मान्यवरांनी कामगार चौकातील फलकाला पुष्पहार अर्पित केले.कार्यक्रमात कामगारांची लक्षणीय उपस्थिती होती.