Home चंद्रपूर  *लोकसहभागातून हत्तीरोग हद्दपार करणे शक्य* – *आमदार प्रतिभा धानोरकर*

*लोकसहभागातून हत्तीरोग हद्दपार करणे शक्य* – *आमदार प्रतिभा धानोरकर*

86

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा* : अपंगत्व निर्माण होण्यास हत्तीरोग हे दुसरे महत्त्वाचे कारण मानले जात असून शारीरिक विकृतीतून विद्रुपीकरण करणारा हा रोग लोकसहभागातून हद्दपार करणे शक्य असून सामुदायिक औषधोपचार मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी येथे केले. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम एमडीए /आयडीए – २०२१ या समारंभात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश राठोड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळू मुंजणकर, तालुका कृषी अधिकारी व्ही.आर. प्रकाश प्रामुख्याने उपस्थित होते.
धानोरकर पुढे म्हणाल्या की, हत्तीरोगाचा प्रसार मुख्यत: क्युलेक्स डासांच्या मादीमुळे होतो. या रोगाने रुग्ण दगावत नसला तरी हत्तीप्रमाणे हातपाय सुजण्यासारख्या शारीरिक विकृती निर्माण होतात व शस्त्रक्रिया केल्यानंतरही विद्रुपता नशिबी येते. नागरिकांची यापासून सुटका करण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर नियोजन केले आहे. हत्तीरोगाचे ट्रीपल डोस देण्यासाठी तालुक्यात ५३६ पथकं तयार करण्यात आल्या आहे. त्यांचे मार्फत डी.ई.सी. व अलबेंडाझॉल या गोळ्या निःशुल्क पुरविण्यात येणार आहे. हत्तीरोग पूर्णपणे नष्ट करण्यासाठी गोळ्यांची एक मात्रा जेवणानंतर जरूर घ्यावी. दोन वर्षांपेक्षा वरील सर्वजण हत्तीरोगविरोधी गोळ्या खाऊ शकतात. मात्र गर्भवती माता आणि अतिगंभीर रुग्णांना यातून वगळण्यात येते. हत्तीरोगाचे जंतू शरीरात शिरल्यावर विकृती येण्यास किमान एक वर्षाचा कालावधी लागतो. करिता वर्षातून एकदा शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या सार्वत्रिक औषधाचे सेवन केल्यास या आजाराला प्रतिबंध घालता येतो, असेही त्यांनी सांगितले.
तहसीलदार बेडसे म्हणाले की, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत अपवाद वगळता सगळ्यांनी मोहिमेदरम्यान वर्षातून एक दिवस या गोळ्या खाल्ल्याने हत्तीरोगाचे प्रसारचक्र थांबविण्यास मदत होवून शासनाचे उदिष्टही सफल होईल. हत्तीरोग दुरीकरणासाठी १ जुलै ते १५ जुलै पर्यंत सामुदायिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येत आहे, यात सहकार्य करून ही मोहीम यशस्वी करावी,असे आवाहनही त्यांनी केले.
सुभाष शिंदे म्हणाले की, प्रशासकीय इच्छाशक्ती आणि नागरिकांचा सहभाग या माध्यमातून हत्तीरोगासह सर्व कीटकजन्य आजाराच्या नियंत्रणाचे प्रभावी काम होऊ शकते. ही योजना यशस्वी करण्यासाठी आपल्या घरी येणाऱ्या आरोग्य कार्यकर्त्यांला सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
डॉ. राठोड म्हणाले की, राज्यातील ६ जिल्हे तर विदर्भातील ५ जिल्ह्यात हत्तीरोगाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. वरोरा तालुक्यात जवळपास ६५४ हत्तीपाय रुग्णसंख्या असून हा आकडा शुन्यावर आणून हत्तीरोगाचा समुळ नायनाट करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समक्ष गोळ्यांचे सेवन करुन ही मोहीम यशस्वी करावी, अधिक माहितीसाठी जवळच्या उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी दवाखाने, उपकेंद्र यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. अंकुश राठोड यांनी केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे पुष्प देवून स्वागत करण्यात आले.
प्रास्ताविकात डॉ. बाळू मुंजणकर यांनी हत्तीरोग व सामुदायिक औषधोपचार मोहीमबाबत नेटके विवेचन केले. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते फीत कापून हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी तहसीलदार प्रशांत बेडसे, डॉ. अंकुश राठोड, डॉ. बाळू मुंजणकर, पत्रकार राजेंद्र मर्दाने, प्रवीण गंधारे यांनी बाऊल मेथडचा वापर करून आयवरमेक्टीन, डी.ई.सी.,व अलबेंडाझॉल गोळ्यांचे प्रत्यक्ष सेवन केले.
कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र चिकटे, ग्राम पंचायत सरपंच यशोदा खामनकर,सदस्य राजू मिश्रा, राहुल ठेंगणे, पत्रकार प्रवीण खिरटकर, चेतन लुतडे, सारथी ठाकुर, चेतना शेटे, इ. प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सहायक एस.एन.येडे यांनी केले. आभार वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंकुश राठोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरोग्य सहायक सुरेश वाते, आरोग्य सेविका श्रध्दा बुराण, स्वाती ठेंगणे, विक्की आत्राम, संजय पवार आदींनी योगदान दिले.