Home चंद्रपूर  रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘ एक डाव भटाचा ‘ नाट्यप्रयोग ठरला संस्मरणीय

रसिक प्रेक्षकांना खळखळून हसवणारा ‘ एक डाव भटाचा ‘ नाट्यप्रयोग ठरला संस्मरणीय

152

आनंदवनातील प्रयोगात्मक नाट्यशुभारंभाने घातली सर्वांवर मोहिनी।।

राजेंद्र मर्दाने @
*वरोरा* : राज कला मंदिर प्रस्तुत, सचिन मोटे ( हास्य जत्रा फेम) लिखित आणि राजेश चिटणीस दिग्दर्शित तसेच अभिजात नाट्यकलेचं दर्शन घडवून प्रेक्षकांना खळखळून हसविणाऱ्या नाट्यकलाकारांनी साकारलेल्या ‘ एक डाव भटाचा ‘ या नाटकाचा पहिलाच प्रयोग आनंदवनातील स्वरानंदवन सभागृहात पार पडला. नाट्य कलावंतांनी सादर केलेल्या सहज सुंदर अभिनयाने रसिकांची मने जिंकणारा हा प्रयोग संस्मरणीय ठरला.
आनंदवनातील स्वरानंदवन सभागृहात धमाल कॉमेडी नाटकाच्या शुभारंभाचा निःशुल्क प्रयोग होणार, असे कळताच प्रेक्षकांनी, विशेषतः विद्यार्थी विद्यार्थिनींनी एकच गर्दी केली. सुमारे १ तास २० मिनिटाचे हे दोन अंकी नाटक म्हणजे गैरसमज, डाव – प्रतिडावाच्या गुंफणातून समोर सरकत जाणारे कथानक. त्यात धुरंधर विनोद विरांनी नाटकाच्या विषयाचे प्रसंग फुलवीत प्रेक्षकांना मनमुराद हसविले.
‘ एक डाव भटाचा ‘ या नाटकात मराठी भाषेवर प्रेम करणारा सुसंस्कृत ब्राह्मण कुटुंबातील बँक कर्मचारी माधव भट ( राजेश चिटणीस) आणि टपोरीछाप झोलर जावई बबन थोरात ( अनिल पाखोडे) याच्यातील डाव – प्रतिडावाची जुगलबंदी, आपापसातील गैरसमजाची पुनरावृत्ती म्हणजे हे ‘ एक डाव भटाचा ‘ नाटक.
माधव भट एक बँक कर्मचारी. माधवची बायको सीमा ( सीमा गोडबोले) ही ‘ हाऊस वाईफ ‘ तसेच शहरातील अण्णा महाराजांची परम भक्त , भटाची मुलगी आशू (ऐश्वर्या शिंदे) हिचा आंतरजातीय प्रेम विवाह. टपोरी भाषा बोलणारा, रिक्शा चालक बबन हा माधव व सीमा भटांचा जावई . बबनची एकंदर वागणूक, बोलचाल माधवला नेहमी खटकते. बबन चुकून एका खोट्या प्रकरणात अडकतो.तेव्हा त्यावर संशय घेऊन त्याची बायको आशू ही बबनला सोडून माहेरी येते. तिच्या मागोमाग तिला सोबत घेऊन जाण्यासाठी बबन सासरी येतो. टपोरी भाषा बोलणाऱ्या बबनच्या प्रति पूर्वग्रहदूषित भावना व मनात राग असल्याने नेमकी ही संधी साधून सासरा माधव हा बबनला घरातून बाहेर काढतो. याचाच राग मनात धरून बबन सासर्‍याला धडा शिकवायचा चंग बांधतो. दुसरीकडे सीमा भट हिचा मुलगी आशू आणि जावई बबनवर जीव असतो. माधवची बायको अण्णा महाराजांची परम भक्त असल्याने घरात मांसाहार पदार्थ खाण्यावर बंदी. शाकाहारी जेवणाला कंटाळलेल्या माधवला चमचमीत मटन खाण्याची इच्छा होते. माधवच्या घराशेजारी असलेल्या वडेवाली वत्सला (भावना चौधरी) चे घरात येणे जाणे असल्याने माधव वत्सलाकडे आपल्या मनातील भावना व्यक्त करतो व गरम, चमचमीत मटणाचा डबा बनवून आणण्यास सांगतो. तद्नंतर गैरसमजाचा आणि डाव – प्रतिडावाचा खेळ सुरू होतो.
माधवचे मराठी भाषेवरचे प्रेम व प्रभुत्व, बबनची बंबईया टपोरी भाषा व स्टाईल आणि वत्सलाच्या भूमिकेने पसरणारे गैरसमज यांच्यातील संगतीने विनोद घडू लागतात. सुरूवातीपासून शेवटपर्यंत नाटक प्रेक्षकांना खिळवून तर ठेवतेच शिवाय खळखळून हसण्यास बाध्यही करते. या नाटकात पोट धरून हसायला लावणारे दर्जेदार विनोद, कलाकारांची अचूक टायमिंग आणि अफलातून शब्दफेक याचा एक सुंदर मिलाप जुळून आलेला दिसतो. सर्वांनी आपापल्या भूमिका चोखपणे बजावल्याने नाटकास एक उंची प्राप्त झाली आहे..
नाटकाचे दिग्दर्शक, उत्कृष्ट कलावंत राजेश चिटणीस यांनी साकारलेली माधव भट ही भूमिका रसिकांच्या मनात आपला आगळावेगळा ठसा उमटवून गेली. भावना चौधरीने ‘ वत्सला ‘ ही भूमिका सुंदररित्या साकारली. शिवाय सीमा गोडबोले ( सीमा) , श्याम आस्करकर (पोलीस कॉन्स्टेबल), अविनाश पाटील ( अर्जून), ऐश्वर्या शिंदे ( आशू) या सर्वांनी त्यांच्या वाट्याला आलेल्या भूमिकेला योग्य न्याय दिला. नाटकात माधव भटाच्या घरी लावलेली अण्णा महाराजांची प्रतिमा लक्षणीय ठरते .
एकंदरीत ‘ एक डाव भटाचा ‘ नाटक सर्व वयोगटातील प्रेक्षकांसाठी निखळ मनोरंजनाची ग्यारंटी असून रंगमंचावर प्रेक्षकांनी हमखास पाहावा,असे जो तो म्हणताना दिसत होता.
सुरूवातीला नाटकातील सर्व कलाकारांनी डॉ.विकास आमटे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. डॉ.आमटे यांनी कलाकारांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात आनंदवनाचे विश्वस्त सदाशिवराव ताजने यांच्या हस्ते नाटकात सहभागी असलेल्या सर्व कलाकारांना ‘आनंदवन प्रयोगवन ‘ आणि ‘ अमृतमंथन ‘ पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी आनंदवनचे कार्यकर्ते राजेश ताजने, दीपक शिव, विजय पिलेवान, अशोक बोलगुंडेवार अविनाश कुळसंगे, रमेश बोपचे, आनंदवन मित्र मंडळ, हिंगणघाटचे अध्यक्ष हेमंत कुलकर्णी, आनंदवन मित्र मंडळ वरोऱ्याचे सचिव राजेंद्र मर्दाने, आनंद माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक प्रदीप कोहपरे, विलास कावलकर, आशिष येटे, धर्मपाल बारसे, मेघराज भोयर, मंगेश चौधरी, खेमचंद नेरकर, विविध शाळांचे विद्यार्थी, आनंदवनाचे कार्यकर्ते आदींची लक्षणीय उपस्थिती होती.