*वरोरा* : गांधी सागर तलाव खोलीकरण कृती समिती मार्फत लोकसहभागातून तलावाच्या खोलीकरण कामाचा शुभारंभ खासदार बाळू धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते भूमिपूजनाने झाल्याने नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, ५० हजारांवर लोकसंख्या असलेल्या वरोरा शहराच्या मध्यभागी २२.५८ हेक्टर अशा विस्तृत क्षेत्रात गावातलाव आहे. क्षेत्र विस्तृत असूनही खोली मात्र कमी असल्यामुळे मुसळधार पाऊस बरसल्याने काही वर्षांपूर्वी हा तलाव फुटून नागरिकांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. त्यामुळे पावसाळ्यात पुन्हा तलाव फुटणार तर नाही ना? अशा चिंतेत प्रशासन असायचे. तलावात पाणी वाढले की शास्त्रीय दृष्टिकोनातून आढावा न घेता भीतीने त्यातील पाणी बाहेर काढण्याची पर्यायी व्यवस्था प्रशासन लगेच करीत असे. त्यामुळे बरेचदा तलावातील जलसाठा कमी व्हायचा. निसर्गाच्या लहरीपणामुळे एकवेळ अशीही आली होती की, गणपती मूर्ती विसर्जनासाठी पाणी पुरेसे नव्हते. याबाबत हलकल्लोळ झाल्यावर तत्कालीन पदाधिकाऱ्यांमार्फत तलाव सौंदर्यीकरण तसेच खोलीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. तलावात उद्याननिर्मिती करण्यात आली होती पण नियोजनाअभावी काही कालावधीनंतर ते बंद पडले होते.
भविष्याचा अचूक वेध घेत शहरातील जागरूक नवयुवकांनी जलसाठा व भूजल पातळी वाढविण्याच्या उद्देशाने ‘ गांधी सागर तलाव खोलीकरण कृती समिती ‘ स्थापन केली आणि लोकप्रतिनिधी, प्रशासन व गावकरी यांच्याशी चर्चा करून संकल्पनेचे महत्त्व पटवून देत सहमती घडवली. परिणामतः लोकसहभागातून २०१९ मध्ये ४५ हजार क्युबिक मीटर ( ४ कोटी ५० लाख लिटर ) जलसाठा होईल, ऐवढे खोलीकरण संभव झाल्याने जनतेत सकारात्मक संदेश गेला. त्याचे रूपांतरण लोकचळवळीत झाले. यावर्षी ५ कोटी लिटर जलसाठा संग्रहीत करण्याचे लक्ष्य निर्धारित करुन खोलीकरणाचा श्रीगणेशा करण्यात आला.
यावेळी खासदार बाळू धानोरकर यांनी गांधी सागर तलाव महसूल विभागाच्या अखत्यारातून काढून तातडीने नगर परिषदेकडे हस्तांतरित केल्यास १० कोटींचा निधी उपलब्ध करून देता येईल, असे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांना सांगितले. त्यामुळे समितीचे सदस्य व नागरिकांचा उत्साह दुणावला आहे.
पूर्वीच्या नकाशाप्रमाणे तलावांची चतु: सीमा बघून तलाव खोलीकरणासह, वृक्षारोपण
, सुशोभीकरण, सौंदर्यीकरणासाठी लोकसहभागातून सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, मुख्याधिकारी गजानन भोयर, न.प. वरिष्ठ अभियंता शशीकांत दलाल, नायब तहसीलदार काळे, गांधी सागर तलाव खोलीकरण कृती समितीचे अध्यक्ष प्रवीण धनवलकर, शहरातील प्रतिष्ठित नागरिक सर्वश्री रमेश राजूरकर, बाबा भागडे, छोटूभाई शेख, विलास नेरकर, मनीष जेठानी, प्रवीण सुराना, दिंगाबर फाळके, पंकज नाशिककर, जयंत टेमुर्डे, डॉ. राजेंद्र ढवस, मोहन रंगदड, नितेश जयस्वाल, जगदीश तोटावार, राजेंद्र मर्दाने, राहुल देवडे, जीएमआर कंपनीचे विनोद पुसदकर, वर्धा पॉवरचे मुकेश ओवे, न.प. अभियंता सूरज पुनवटकर, स्वच्छता निरीक्षक भूषण सालवटकर प्रामुख्याने उपस्थित होते.