Home चंद्रपूर  *पत्नीसह मुलावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला ३ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा*

*पत्नीसह मुलावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला ३ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा*

105

*अंड्यांची भाजी न बनविल्याने राग अनावर होऊन कुऱ्हाडीने मारहाण*
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* :- अंड्याची भाजी खाण्याची तीव्र इच्छा असताना तेल – मीठ नसल्याचे कारण सांगून भाजी बनविण्यास असमर्थता दर्शविणा-या पत्नीला शिव्यांची लाखोली वाहत तिला लोखंडी पात्याच्या कुऱ्हाडी व दाड्यांने मारहाण करून आईचा बचाव करण्यासाठी आलेल्या मुलालाही जीवानिशी ठार मारण्याच्या इराद्याने बेदम मारहाण करणाऱ्या आरोपी वामन गोविंदा वालकुंटेवार ( वय ६५ वर्षे ) याला वरोरा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. भेंडे यांनी वेगवेगळ्या कलमाखाली मंगळवारी ३ वर्ष सक्त मजूरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. डिसेंबर २०१४ मधील ही घटना असून याबाबत भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबतची माहिती अशी की, शेतमजुरी करून उदरनिर्वाह करणारी लक्ष्मी वामन वालकुंटेवार ( वय ६५ वर्षे) ही पती वामन गोविंदा वालकुंटेवार, दोन मुलांसह वडेगाव, पो – गुडगाव ता. भद्रावती येथे राहत होती. सर्वात लहान मुलगा बाहेर गावी राहत होता. रविवार, दि. २८ डिसेंबर २०१४ रोजी सकाळी शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्यावर सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास लक्ष्मी घरी आली तेव्हा पती वामन एकटाच घरीच होता, मोठा मुलगा बाहेर गेला होता. थोड्या वेळाने पती वामन याने पत्नी लक्ष्मी हिला अंड्यांची भाजी बनवायला सांगितली. तेव्हा पत्नीने पतीरायाला घरात तेल- मीठ नाही असे सांगितले असता पतीचा राग अनावर झाला व त्याने पत्नीला शिव्यांची लाखोली वाहण्यास सुरुवात केली. दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली त्यात पतीने घरात कोपऱ्यात ठेवलेल्या लोखंडी पात्याच्या कुऱ्हाडीने व त्यांच्या दाड्यांने पत्नीच्या शरीराच्या विविध भागांवर वार करून गंभीर जखमी केले. घराजवळील चौकात असलेल्या मुलाला घरातील झगड्याचा आवाज येताच तो तात्काळ घरी दाखल झाला. वडील आईला मारत असल्याचे बघून त्यांने वडिलांना यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला असता वडिलाने मुलावरही वार करीत त्यास गंभीर जखमी केले. तद्नंतर कुऱ्हाड घेऊन घरून निघून गेला. जखमी अवस्थेत आई व मुलगा शेजारच्या घरी गेले. थोड्या वेळाने गावच्या लोकांच्या मदतीने भद्रावती पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. फिर्यादीची तक्रार व मेडिकल रिपोर्ट वरून भद्रावती पोलिसांनी आरोपी वामन वालकुंटेवार याच्या विरोधात अपराध क्रमांक ३००/१४ कलम ३०७,५०४ भादंवी अन्वये गुन्हा नोंद करून घेतला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक आशिष गजभिये, पो.स्टे.भद्रावती यांनी करून आरोपीच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करीत वरोरा येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणात ५ विविध साक्षीदार तपासण्यात आले होते. मंगळवार ( ८ मार्चला) या केसचा अंतिम निकाल लागला. आरोपी विरूद्ध आरोप सिद्ध झाल्याने वरोरा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश डी.के भेंडे यांच्या न्यायालयाने आरोपी वामन गोविंदा वालकुंटेवारला विविध कलमाखाली ३ वर्ष सक्त मजुरीची व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील मिलिंद देशपांडे यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी म्हणून इंदिरा शास्त्रकार यांनी कामकाज पाहिले.