Home चंद्रपूर  *वरोरा ट्रामा केअर युनिट परिसरात जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

*वरोरा ट्रामा केअर युनिट परिसरात जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

157
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : आधुनिक सुश्रूषा शास्त्राची संस्थापिका, आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाईटिंगल यांच्या २०० व्या जयंती तथा परिचारिका दिनाच्या सुवर्ण मह़ोत्सवाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय, वरोरा यांच्या वतीने स्थानीक ट्रामा केअर युनिट परिसरात जागतिक परिचारिका दिनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर आर्णी मतदार संघाचे खासदार बाळूभाऊ धानोरकर हे होते.
व्यासपीठावर उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल्ल खूजे, उपजिल्हा रुग्णालयाच्या अधिसेविका वंदना बरडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी आयेशा कारदार, आंनदवन मित्र मंडळाचे सचिव राजेंद्र मर्दाने, अध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर, आनंदम् फाऊंडेशनचे महाराष्ट्र समन्वयक डॉ. वाय. एस. जाधव, इनरव्हील क्लब अध्यक्षा निलिमा गुंडावार, सचिव डॉ. साक्षी उपलेंचवार, पदाधिकारी स्नेहल पत्तीवार, निलिमा गुंडावार, उपजिल्हा रुग्णालय प्रतिनिधी सुभाष दांदडे, प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात खा.धानोरकर म्हणाले की, कोणत्याही रुग्णालयात रुग्ण हा डाक्टरपेक्षा अधिक काळ परिचारिकेच्या देखरेखीखाली असतो. रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा तसेच सर्वांचे आरोग्य सुदृढ राहावे या कर्तव्य भावनेने परिचारिका भगिनी काम करतात. फ्लॉरेन्स नाईटिंगल यांच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांनी परिचारिकांना जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
राजेंद्र मर्दाने म्हणाले की, सेवा, त्याग, समर्पणाचे दुसरे नाव परिचारिका आहे. परिचारिकेचे महत्व कोरोना काळात आपल्याला प्रभावीपणे जाणवले. सीमेवरील जवानाप्रमाणे आपले प्राण तळहातावर घेऊन कोरोना काळात रुग्णांची सेवा केली. कधी संसर्ग होईल हे सांगता येत नसताना सुद्धा संसर्ग होईल या भीतीने रुग्णाला वाऱ्यावर सोडले असे कधीच घडले नाही. सरकारी रुग्णालयाप्रमाणे खाजगी रुग्णालयात ही परिचारिकेची कर्तव्य सॅलूट करणारे आहे.
डॉ. मुधोळकर म्हणाले की, परमेश्वराला कुणीच बघितलेलं नाही पण अशा काही लोकांना बघितलं जे लोकांची या पद्धतीने मदत करतात जसे परमेश्वराने खास आमच्यासाठीच पाठविलेले आहे. दवाखान्यात उपचारार्थ दाखल झाल्यानंतर आम्ही अनुभवतो की, डाक्टर वेळोवेळी येतात परंतु परिसेविका दिवसभर नाही तर रात्रभर सुद्धा आमची सेवा करतात. म्हणूनच परिचारिका करीत असलेली मानवतेची सेवा नेहमीच आदरास पात्र ठरली आहे.
डॉ. खुजे म्हणाले की, आज वैद्यकीय क्षेत्रात परिचारिका केवळ सर्विस नाही तर स्कॉलर डाक्टरांना ट्रेनिंग सुद्धा देतात. परिचारिकेचे कार्य अतुलनीय असून दवाखान्यात डाक्टरांपेक्षाही परिचारिकेचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळे नर्सिंग कडे जाणाऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होत आहे, असे त्यांनी नमूद केले.
रुबिना खान यांनी दैनंदिन जीवनात परिसेविकांना भेडसावणाऱ्या समस्या व कोराना काळात आलेले आपले अनुभव कथन केले.
यावेळी इनरव्हील क्लबच्या पदाधिकारी निलिमा गुंडावार, साक्षी उपलेंचीवार, स्नेहल पत्तीवार, बालविकास अधिकारी आयेशा कारदार, उपजिल्हा रुग्णालयातील डा. हरियाणी, आदींची समयोचित भाषणे झाली.
प्रास्ताविकात अधिसेविका वंदना बरडे यांनी फ्लॉरेन्स नाईटिंगल यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. परिचारिकांनी जबाबदारीने कार्य करावे. योग्य वेळी त्यांच्या कार्याची दखल नक्कीच घेतल्या जाईल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला खा. धानोरकर यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत फ्लॉरेन्स नाईटिंगल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच प्रतिमेसमोर मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या.
याप्रसंगी इनरव्हील क्लब पदाधिकारी यांचे हस्ते सर्व परिचारिकांना उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. आनंदवन मित्र मंडळातर्फे बुके देऊन सर्व परिचारिकांचा यथायोग्य सत्कार करण्यात आला.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य सहाय्यक एस.एन. येडे, गोविंद कुंभारे, दीपक खडसाने, दीपक अंबादे, डॉ. प्रवीण बुटोलीया, इन्चार्ज परिसेविका सुनंदा पुसनाके, इंदिरा खोडपे, विजया रुईकर, सरस्वती कापटे, तुलसी कुमरे, आनंदवन मित्र मंडळाचे पदाधिकारी प्रा. बी.आर. शेलवटकर, महेश वानखेडे, पत्रकार प्रवीण गंधारे इ.ची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सोनाली गायकी यांनी केले तर आभार रुबीना खान यांनी मानले.
कार्यक्रमानंतर लगेचच परिसेविकेंसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उपजिल्हा रुग्णालयातील सर्व परिचारिकेंनी आपला सहभाग नोंदविंला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आरती बैस, अंकिता टोंगे, मीना मोगरे, वैशाली मानमोडे, प्रियंका दांडेकर, सुजाता नवघरे, आफरिन शेख अयुब, अश्विनी भागडे, मनीषा गवई, सोनाली शेंडे, मुक्ता मुंडे, शीतल राठोड, सपना राठोड, सोनल घाग, रोशनी श्रृंगारे, प्रणाली अलोने आदींनी परिश्रम घेतले.
यावेळी उपस्थितांनी कर्तव्यनिष्ठतेची प्रतिज्ञा घेतली.