Home चंद्रपूर  १५ ऑगस्टला चित्रकार प्रल्हाद ठक यांच्या वरोरा येथील कलादालनात स्वरक्ताने काढलेल्या चित्रांचे...

१५ ऑगस्टला चित्रकार प्रल्हाद ठक यांच्या वरोरा येथील कलादालनात स्वरक्ताने काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन.

68

निःशुल्क प्रदर्शनी सर्वांसाठी खुली ; देशभक्तांचे चित्र पाहून तरुणांना मिळेल प्रेरणा!

   *राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : जिल्ह्यातील कलाप्रेमी मुला – मुलींच्या कला अविष्काराला प्रोत्साहन देण्यासाठी येथील नामवंत कला शिक्षक, विश्वविक्रमी महा रांगोळीकार व राष्ट्रीय चित्रकार प्रल्हाद ठक यांनी ” ठक आर्ट गॅलरी (कलादालन) ” ची स्थापना केली आहे. सरदार पटेल वार्डातील गजानन नगर येथील त्यांच्या निवासस्थानी ८०० स्के. फुट जागेवर कलादालन सुरू करण्यात आले आहे. आधुनिक कला ( Modern Art ), वास्तववादी कला ( Realistic Art ),  अमूर्त कला (Abstract Art), कॅनवासवर स्वरक्ताने काढलेली चित्रे व विविध कलाकृतील निवडक चित्रे या कलादालन ठेवण्यात येणार आहेत. येत्या १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९•०० ते सायंकाळी ७•०० या वेळेत प्रदर्शनी सर्व वयोगटातील व्यक्तींना विनामूल्य पाहण्यास खुली राहील. कलाप्रेमी प्रेक्षकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चित्रकार प्रल्हाद ठक यांनी केले आहे.
” कलादालन ” अशी एक जागा आहे जिथे चित्र रसिकांनी आयुष्यात एकदा तरी भेट दिली पाहिजे. जगातील न्युयॉर्क, लंडन, पॅरिस, बर्लिन, हाँगकाँग, सोल, शांघाय, जिनिव्हा आदी देशांत तसेच भारतातही असंख्य आर्ट गॅलऱ्या आहेत. त्यात गॅगोसियन आर्ट गॅलरी, हॉसर वीर्थ आणि पेस गॅलरी, डेव्हिड झ्विरनूर, व्हाईट क्यूब, लिसन गॅलरी, थंडेयस रोपॅक , लेहमन मौपिन आणि परोटिन गॅलरी तर भारतात नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट,  दिल्ली आर्ट गॅलरी, आकृती आर्ट गॅलरी, ललित कला अकॅडमी, त्रिवेणी कला संगम या व इतर १ ते ५ स्टार पर्यंतच्या अनेकानेक आर्ट गॅलऱ्या आहेत. त्यात सन २०१७ मध्ये स्थापित  जिल्ह्यातील ठक आर्ट गॅलरी ( कलादालन) ही कलाप्रेमीसाठी एक पर्वणीच ठरली आहे. कुणाचेही प्रायोजकतत्व न घेता, स्वबळावर मागील अनेक वर्षांपासून प्रल्हाद ठक राज्यातील महानगर आणि छोट्या शहरात प्रदर्शनी भरवित आहेत. या प्रदर्शनाला आजतागायत हजारो रसिक प्रेक्षकांनी वेळोवेळी भेट देऊन भरभरुन दाद दिली आहे. प्रल्हाद ठक स्वरक्ताने चित्र बनविण्यासाठी सुपरिचित आहेत. त्यांनी स्वरक्ताने काढलेल्या चित्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राजमाता जिजाऊ,  अहिल्याबाई होळकर, राजाराम मोहन रॉय, म.ज्योतिबा फुले,  राष्ट्रपिता म. गांधी, लो. टिळक, पं. नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार पटेल, राजर्षी शाहू महाराज, इंदिरा गांधी, लाल बहादूर शास्त्री,  खान अब्दुल गफार खान, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, मदनलाल धिंग्रा, स्वामी विवेकानंद, मदर तेरेसा, बाबा आमटे, डॉ. चंद्रशेखर, व्ही. रमण, परमवीर चक्र विजेता कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार अब्दुल हमीद, कॅप्टन विजय बत्रा, नायक यदुनाथ सिंह, सेकंड लेफ्टनंट रामा राघोबा राणे, मेजर धनसिंग थापा, सुभेदार जोगिंदर सिंग इत्यादी देशातील थोर महापुरुष, क्रांतीकारक, समाजसेवी, शास्त्रज्ञ, परमवीर चक्र विजेता यांचा समावेश आहे.
कला शिक्षक ठक महारोगी सेवा समिती, वरोरा संचालित आनंद मूक बधिर विद्यालय, आनंदवन तसेच आपल्या आर्ट गॅलरीच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून नवीन चित्रकार घडविण्याचे कार्य सृजनात्मक पध्दतीने करीत आहेत. आजपर्यंत हजारों विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडून चित्रकलेचे धडे गिरवले आहेत. त्यातल्या अनेकांनी जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुराही खोवला आहे. ठक कलादालनात शिकून अनेक गरिबांची मुले तयार झाली व होत आहेत. या लहान चित्रकारांनी चितारलेली चित्रे प्रदर्शनात रसिकांना पाहण्यास उपलब्ध राहतील.
विशेषतः २६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट या दिवशी  कलादालन सर्वांसाठी खुले असते. वर्षातील इतर दिवशी सुद्धा कलादालन खुलेच असते.  मात्र मर्यादित वेळ असल्याने गैरसोय टाळण्यासाठी पूर्व सूचना देऊन वेळ घेणे संयुक्तिक राहते .
मागील वर्षी शार्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत कलादालनातील बहुसंख्य अनमोल पेंटिंग्ज जळून खाक झाल्या तरीही ठक यांनी हिंमत न हारता दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर अत्यंत मेहनतीने कलादालनाला पुन्हा सुशोभित केले आहे.

*” ठक आर्ट गॅलरी ” ची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत*
१) ही जिल्ह्यातील एकमेव आर्ट गॅलरी आहे.
२)  कला पाहण्यासाठी आर्ट गॅलरीला भेट दिल्यास मिळणाऱ्या आनंदाने मन निश्चितच प्रसन्न होतं .
३) कलादालन पाहण्यासाठी पूर्व परवानगी घेण्याची किंवा टिकिट काढण्याची गरज नाही.
४)  चित्रकारासोबत वैयक्तिकरित्या बोलण्याची, वेगवेगळ्या चित्रातील बारकावे समजून घेण्याची संधी मिळते .
५) चित्र रसिकांची सर्जनशीलता वाढते आणि भावनिक बुद्धिमत्ता देखील सुधारते.
६) कलाप्रेमींना त्यांच्या ज्ञानाचा
विस्तार करण्यासाठी आणि यापूर्वी न पाहिलेल्या नवीन प्रकारच्या कलाकृतीचा अनुभव घेता येतो.
७) देशभक्ताचे, क्रांतीवीरांचे ,थोर महापुरुष, समाजसेवी, विचारवंत, शास्त्रज्ञ यांचे रक्ताने बनविण्यात आलेले चित्र पाहून तरुणांना निश्चितच प्रेरणा मिळते.
या प्रदर्शनाला जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी, चित्र रसिकांनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन ठक यांनी केले असल्याचे राजेंद्र मर्दाने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.