*वरोरा* : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न मी सदोदित केला असून जनतेने भरभरून दिलेल्या प्रेम व आशीर्वादामुळे नगराध्यक्ष म्हणूनही माझी कारकीर्द संस्मरणीय ठरत असल्याने पदावर असो किंवा नसो जनसेवेचे उत्तरदायित्व आजन्म निभावणार, असे भावोत्कट प्रतिपादन नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांनी येथे केले. नगराध्यक्ष पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीने आशीर्वाद मंगल कार्यालयात त्यांचा हृद्य सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामवंत साहित्यिक, विचारवंत तसेच भारतीय मुस्लिम आरक्षण समितीचे प्रमुख प्रा.जावेद पाशा कुरेशी होते.
सत्कार सोहळ्याला आनंद निकेतन महाविद्यालयाचे प्रा. शौकत शाह, समाजाचे ज्येष्ठ नागरिक ग.म. शेख, शाबान शेख व आसिफ रजा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अली पुढे म्हणाले की, नगराध्यक्ष पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रमुख समस्या दिसली ती अस्थाई मुख्याधिकारी, सोबतच नगर परिषदेमध्ये विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांची कमतरता त्यामुळे विकासकामांना खीळ बसली होती. ही कमी पूर्ण करून यशस्वी वाटचाल सुरू असताना कोरोनामुळे जनजीवन विस्कळित झाले. त्यात पुन्हा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या बदल्या या सर्व प्रकारातून विकास साधणे माझ्यासाठी अग्निपरीक्षाच होती. यातूनही सर्वांना सोबत घेऊन मी वरोराकरांसाठी काही सकारात्मक करू शकलो याचे मला समाधान आहे, असे भावोद्गार काढत त्यांनी आयोजकांचे मनस्वी आभार मानले.
अध्यक्षीय भाषणात जावेद पाशा म्हणाले की, शहराचा ‘ न भूतो न भविष्यति ‘ असा विकास साधणारे नगराध्यक्ष आपल्याला लाभले हे आपले भाग्य असल्याचे नमूद केले. आपल्या समाजाचा नगराध्यक्ष हा आपल्यासाठी समाजभूषण आहे व तो एक माणिक असून त्याची पारख एक सोनार म्हणून आपण करायला हवी, असे ते म्हणाले.
कार्यक्रमात मौलाना आझाद लायब्ररी, भारतीय मुस्लिम परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजातील मान्यवर व सुजाण नागरिकांनी नगराध्यक्ष अहेतेशाम अली यांचा यथोचित सत्कार केला.
प्रास्ताविक नियाज सैय्यद यांनी केले. सूत्रसंचालन अजिम शेख यांनी केले.
कार्यक्रमात डॉ. शेख, शाहिद अख्तर, अशफाक शेख, राहील पटेल, इकबाल शेख, मोहम्मद शेख, अयुब खान, पाशा काजी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्कार समितीचे सदस्य सर्वश्री जुबेर कुरैशी, शाहिद काजी, बाबू शेख, जावेद शेख, कादर शेख, शोएब शेख, ईकलाख रंगरेज, फहिम काजी,अजहर खान, ताहूर शेख, वशीम शेख, अन्सार शेख, शहाबाज शेख, मुस्ताक शेख इ.नी परिश्रम घेतले.