*वरोरा* : आतापर्यंत परंपरेने वारसा हक्क म्हणून मिळणारी पुरुषसत्ताक मानसिकता बदलण्याची गरज असून उद्याच्या लिंगभावमुक्त समाज निर्मितीसाठी विद्यार्थी दशेतच संस्कार होणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन महिला अध्ययन विषयाचे अभ्यासक डॉ प्रवीण मुधोळकर यांनी येथे केले. आनंद माध्यमिक विद्यालय, आनंदवन येथे आयोजित जागतिक महिला दिनाच्या पर्वावर ‘ उद्याच्या स्त्री – पुरुष समानतेवर आधारित समाज निर्मितीमध्ये माझी भूमिका ‘ या विषयावर ते प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका विद्या टोंगे होत्या.
याप्रसंगी मंचावर मुख्य अतिथी म्हणून आनंदवनचे कार्यकर्ते राजेश ताजने, शिक्षक प्रदीप कोहपरे, मयूर गोवारदिपे आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
मुधोळकर पुढे म्हणाले की, अनेक जबाबदाऱ्या सांभाळूनही कुटुंब व समाजात स्त्रियांच्या योगदानाचे कुठलेही मोल केल्या जात नाही. प्रत्येकाने घरातील आई – बहिण, पत्नी आदींच्या श्रम, कौशल्य आणि कुटूंब वत्सलतेच्या भावनेचा आदर करून त्यांच्याप्रती कृतज्ञ राहिले पाहिजे, स्त्री – पुरुष समानता ,लिंग भेद या विषयीचे विविध पैलू त्यांनी आपल्या मनोगतातून मांडले.
अध्यक्षीय भाषणात मुख्यध्यापिका टोंगे म्हणाल्या की, वरवर पाहता समाजामध्ये स्त्री – पुरुष समानता आहे, असा आभासही होतो. मात्र प्रत्यक्षात अजूनही समाजामध्ये छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्त्रियांना खूप संघर्ष करावा लागत आहे. अधिकाधिक स्त्रिया सार्वजनिक क्षेत्रात अनेक जबाबदाऱ्या निभावत आहेत आणि स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटनाही वाढत आहे. ह्यासाठी सामाजिक प्रबोधन आणि स्त्रियांचा माणूस म्हणून आदर समाजात रुजवणे गरजेचे आहे.
ताजने म्हणाले की, अलीकडच्या काळात विद्यार्थिनींच्या तुलनेत विद्यार्थ्यांच्या प्रगतीची होणारी घसरण ही चिंता व चिंतनाची बाब आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळाची पावले ओळखून स्वतः मध्ये बदल करावा.
यावेळी मयूर गोवारदिपे व शाळेच्या विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात इयत्ता नववीतील पुस्तकावर आधारित एक नाटिका सुद्धा विद्यार्थ्यांनी सादर केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
प्रास्ताविक प्रदीप कोहपरे यांनी केले. सूत्रसंचालन आशीष येटे यांनी तर आभार प्रदर्शन स्मीता काळे यांनी केले.