*वरोरा*: वरोरा-भद्रावती-चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मर्दाने यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत विभागीय रेल्वे प्रबंधक ( वाणिज्य) अमन मित्तल (भा.रे.या.से.) यांनी अत्यंत आपुलकीने सकारात्मक चर्चा करीत सर्व न्याय्य मागण्याबद्दल स्वतः पुढाकार घेऊन संबंधित वरिष्ठांकडे गांभीर्याने पाठपुरावा करण्याचे आश्वस्त केल्याने रेल्वे प्रवासी संघाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
याबाबत अधिक वृत्त असे की, रेल्वे संबंधित विविध मागण्यांबाबत साखळी उपोषणकर्त्यांना आमोरासमोर चर्चेसाठी विभागीय रेल्वे प्रबंधक( वाणिज्य) अमन मित्तल यांनी ता.१५ ऑक्टोबरला निमंत्रित केल्यानुसार सदर बैठक पार पडली. यावेळी शिष्टमंडळात प्रवीण गंधारे, खेमचंद नेरकर, शाहिद अख्तर,अमोल पाटील यांचा समावेश होता.
चर्चेदरम्यान मागील १७ वर्षांपासून विविध रेल्वेविषयक मागण्या कशा प्रलंबित आहेत, कोरोना काळात बंद झालेल्या रेल्वे आजतागायत कशा बंद आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांची कशी ससेहोलपट होत आहे, हे त्यांना सोदाहरण पटवून देण्यात आले. शिवाय रेल्वे स्टेशन फलाटावर प्रवाशांच्या सुविधेसाठी आवश्यक असलेल्या बाबींचा उहापोह करण्यात आला. त्यावर विभागीय रेल्वे प्रबंधक सहमत झाले आणि सर्व बारा मागण्यां न्यायोचित असल्याने मी स्वतः पुढाकार घेऊन वरिष्ठांकडे मांडेन, असे आश्वस्त केले. एकंदरीत सर्व चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याने प्रवासी संघाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सर्वसामान्य जनतेशी निगडित समस्यांचा निपटारा करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे, असे आवाहन राजेंद्र मर्दाने यांनी केले असून मुख्य महाप्रबंधक यांची मुंबई येथे व रेल्वे मंत्री महोदयांची लवकरच दिल्ली येथे भेट घेणार असल्याचे सांगितले.
यावेळी मध्य रेल्वे ,नागपूर चे विभागीय वाणिज्य निरीक्षक मंगेश तितरमारे, आरपीएफ चे हेड कॉन्स्टेबल सैय्यद आबीद उपस्थित होते.