*पत्रकार परिषदेत वरोरा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांचे प्रतिपादन*
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : भद्रावती – वरोरा उपविभागात रिक्त असलेली पोलीस पाटील पदे भरण्याबाबत ६ जून २०२३ रोजी ‘ जाहीरनामा ‘ जाहिरात प्रसिद्ध करून अर्हताधारक अर्जदारांकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पद्धतीने अधिकृत अर्ज मागविण्यात आले होते. उमेदवारांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यापूर्वी या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्याचे खंडन करीत जाहीरनाम्यात अंतर्भूत निवड कार्यपद्धतीच्या अटी व शर्तीनुसारच ही पोलीस पाटील भरती प्रक्रिया पार पाडली जात असून ती पूर्णतः निष्पक्ष आणि पारदर्शी पद्धतीने होत असल्याची ग्वाही उपविभागीय दंडाधिकारी वरोरा व पोलीस पाटील भरती- २०२३ निवड समिती वरोऱ्याच्या अध्यक्षा डॉ. शिवनंदा लंगडापूरे यांनी त्याच्या दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
त्यांनी पुढे सांगितले की, चंद्रपूर जिल्ह्याच्या त्यांच्या कार्यक्षेत्रातील वरोरा – भद्रावती उपविभागातील गावांत रिक्त असलेल्या ८८ पोलीस पाटील पद भरतीसाठी https ://warora. ppbharti.in हे संकेतस्थळ दिले होते. अर्हताधारक अर्जदारांनी पोलीस पाटील पदाकरीता किमान आवश्यक पात्रता, पदाचे एकूण आरक्षण, प्रवर्ग निहाय संख्या, परिक्षेचे स्वरूप, निवड कार्यपद्धती अटी व शर्ती, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इ. संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक समजून, फक्त ऑनलाईन पद्धतीने उपरोक्त संकेतस्थळावर अधिकृत अर्ज करावे,असे संबंधित कार्यालयाकडून निर्देशित होते. ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात दिनांक ७ जून २३ पासून झाली होती आणि अंतिम मुदत दि.२३ जून २३ होती. पोलीस पाटील पदाच्या एकूण ८८ जागेपैकी ७४ जागेसाठी जवळपास ५३८ उमेदवारांनी अर्ज भरले. यात ५०३ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. लेखी परीक्षा ८० गुणांची होती. यात ४५ टक्के म्हणजे ३६ गुण अर्जित करणाऱ्या उमेदवारांमधील उच्चतम गुण मिळालेल्या, एका गावातील सरासरी तीन उमेदवार पात्र समजून एकूण उत्तीर्ण ३३१ पैकी १७७ उमेदवारांची तोंडी परीक्षेसाठी निवड करण्यात आली आहे. यात भद्रावती तालुक्यातील २६ गावांतील ६५ तर वरोरा तालुक्यातील ४८ गावांतील ११२ उमेदवारांचा समावेश असून ३० टक्के महिला आरक्षण आहे. २० आणि २१ जुलै २०२३ रोजी क्रमशः १०० आणि ७७ पात्र उमेदवारांची २० गुणांची तोंडी परीक्षा ( मुलाखत) असून २४ जुलैला निकाल घोषित करण्यात येणार असल्याचे डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत वरोऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी उपस्थित होते.
निवड समितीमध्ये उपविभागीय दंडाधिकारी, वरोरा तथा अध्यक्ष पोलीस पाटील भरती २०२३ निवड समिती, वरोरा ; उपविभागीय पोलिस अधिकारी, वरोरा ; संबंधित तालुक्याचे तहसीलदार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी, जिल्ह्याचे आदिवासी प्रकल्प अधिकारी यांचा समावेश असणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.