Home चंद्रपूर  *वरोरा येथे बंजारा परंपरेतील सार्वजनिक तिज महोत्सव उत्साहात साजरा

*वरोरा येथे बंजारा परंपरेतील सार्वजनिक तिज महोत्सव उत्साहात साजरा

61

*वरोरा* : बंजारा समाजातील महिलांच्या पुढाकाराने समाजाच्या परंपरेतील संस्कृतीचे दर्शन घडविणारा सार्वजनिक तिज महोत्सव नुकताच येथील कटारिया सभागृहात मोठया उत्साहात साजरा कऱण्यात आला.या महोत्सवात शहरातील जवळपास ३० बंजारा परिवारातील कौटुंबिक सदस्यांनी सहपरिवार सहभाग घेतला.कार्यक्रमात पुनम पवार, वंदना राठोड, पुष्पा आडे, संगीता राठोड, उर्मिला मेघावत, निलम राठोड, वनिता पवार इ.ची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रमुख मान्यवर महिलांनी ‘ तिज ‘ सणाचे महत्त्व विशद केले. त्यांनी सांगितले की, प्राचीन काळापासून दऱ्याखोऱ्यात वावरणाऱ्या बंजारा

समाजाचा इतिहास लोकसंस्कृती मधून दिसून येतो. बंजारा समाजाच्या पारंपरिक तिज महोत्सवात समाजाच्या प्रथा, रुढी, परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन घडते. समाजाची प्रगती साधण्यासाठी, समाजाच्या लोककला, रुढी आणि परंपरा प्रवाहित राखण्यासाठी श्रावणातील तिज हा उत्सव बंजारा समाज जीवनाचे अंग ठरला आहे.’ तिज ‘ उत्सव म्हणजे बंजारा स्त्रियांचा व अविवाहित युवतींचा आवडता उत्सव होय. पूर्वी बंजारा समाज एकाच ठिकाणी स्थिरावल्यानंतर याकाळात लग्न कार्य करीत असत. ‘ लेदनी ‘ काळात दोन तांडे पावसाळ्यात विखुरले गेले की पुन्हा भेटीची शक्यता फार कमी असायची. त्यामुळे लग्न झालेल्या मुलीला दुःख होई. या दुःखाचा विसर पडावा म्हणून तिज उत्सव साजरा करण्यात येत होता. यावेळी लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली, महिला ‘ तिज ‘ उत्सवाच्या निमित्ताने माहेरी येतात. त्यामुळे या उत्सवाला वेगळे महत्त्व आहे..
या उत्सवाच्या कालावधीत उंच उंच झोपाळे बांधून झोपाळ्यावर अनेक धार्मिक कथा ऐकविल्या व गीते गायिली जातात. या उत्सवात समाजातील अविवाहित युवतीं, महिला तसेच सर्व स्तरातील आबालवृद्ध गीत गात नृत्यही सादर करतात.
प्रत्येक समाजातील लोकसंस्कृती,सण,आणि उत्सवामध्ये विशेषताअसते. त्याचप्रमाणे बंजारा लोकसंस्कृतीमध्येही तिज महोत्सवाला विशेष महत्त्व दिले जाते, असे त्यांनी सांगितले.
तिज उत्सव कार्यक्रमांतर्गत जन्माष्टमीच्या नऊ दिवसांपूर्वी वारुळाची माती दरडीमध्ये घेऊन गव्हांचे बीजारोपण करण्यात आले. वारुळाच्या मातीने गव्हाचे रोपटे वेगाने वाढते. तिज विसर्जनाच्या अगोदर ” ढबोळी ” चा कार्यक्रम झाला. कृष्ण जन्माष्टमीला या गव्हांकुरीत दरडीची विधिवत पूजा केली जाते व विसर्जनाच्या दिवशी दफडीच्या तालावर हातात जवारा घेऊन महिलां,युवतींनी नृत्य सादर केले. शहरात प्रथमताच समाज बांधवानी पारंपरिक पद्धतीने ‘ तिज ‘ उत्सव आनंदात साजरा केला. तसेच या प्रसंगी वरोरा शहरातील सर्व बंजारा समाज बांधवांनी या कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला माता पोहरादेवी व संत सेवालाल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्वांनी सार्वजनिक तिज महोत्सव अतिशय उत्साहात व जल्लोषात साजरा केला.
कार्यक्रमात पवार सर, डॉ. अंकुश राठोड, प्रा.सचिन जाधव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी

*वेती जा ये वेती जा* I
*जा मारी सातण वेती जा* ॥
*झाडीन देखण याढी केस* ।
*दातण देखण सातण जा* ॥
*वेती जा मारी सातण वेती जा* ।

अशा प्रकारे गीत गात ‘ तिज ‘ ची दरडी ( गौरी ) आणि ‘ गणगोर ‘ यांना नदीच्या प्रवाहात विसर्जित करण्यासाठी घेऊन गेले.
शेवटी बंजारा समाजाचे कारभारी यांनी सर्व बांधवांचे आभार मानत कार्यक्रमाचा समारोप केला.