*पोलीस अधिकारी नोपाणी यांच्या धडक कारवाईने वाळू तस्करांत खळबळ, महसूल अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले*
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे काम महसूल विभागाचे असतानासुद्धा त्यांच्याकडून अपेक्षित कर्तव्याची पूर्तता होत नसल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चमूने गुप्त माहितीच्या आधारे सोमवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास बोरी रेती घाटावर छापेमारी करून वाळू तस्करीसाठी वापरण्यात येणारे ४ ट्रक आणि एक पोकलॅन्ड मशीनसह एकूण ५२ लाख १८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन ४ वाहन चालकांसह ६ आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे वाळू तस्करांत खळबळ उडाली असून अनेक वाळू तस्कर भूमिगत झाले आहेत शिवाय महसूल विभागाचेही धाबे दणाणले आहे. परिणामतः महसूल व पोलीस विभागात शीतयुद्ध निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.
अधिक माहितीनुसार तालुक्यातील एकूण रेती घाटांपैकी काही रेती घाटांचे लिलाव झाले असून काही रेती घाटांचे लिलाव होणे बाकी आहे. मागील काही वर्षांपासून तालुक्यात रेती माफिया सक्रिय झाले असून वाळू तस्करांचा महसूल तथा संबंधित विभागाच्या संगनमताने नदीपात्रातून दिवसरात्र पोकलॅन्ड, बोट आदींच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरू आहे. अनेकदा रेतीचे ट्रक/ टैक्टर पकडून ते तहसील कार्यालयात जमा केल्याचा आभास निर्माण केल्यावर अर्थपूर्ण व्यवहार करून सोडून दिल्या जात असल्याचे कळते. त्यामुळे महसूल विभाग खिशात असल्याची भावना तस्करांमध्ये दिसून येते. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल दर महिन्यात बुडत असून संबंधित अधिकारी मात्र आर्थिकदृष्ट्या गब्बर होत आहेत. कर्तव्यात हयगय व शासनाची दिशाभूल करणाऱ्या काही अधिकाऱ्यांच्या मालमत्ता प्रचंड वेगाने वाढत आहे. एकाने खाल्ली तर विष्टा पण अनेकांनी मिळून खाल्ली तर ती श्रावगी ठरते, असा हा प्रकार आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणावर नदीपात्रातून रेतीची तस्करी होत असल्याच्या घटना तालुक्यात नवीनच रुजू झालेले उपविभागीय पोलीस अधिकारी नोपाणी यांच्या निदर्शनास आल्या. त्यातच वरोरा शहरापासून २० किमी पश्चिमेकडे असलेल्या बोरी घाटातून विना परवाना दिवसरात्र रेती उपसा होत असल्याची गुप्त माहिती खबरीकडून मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक खोब्रागडे,अपराध शाखेचे किशोर मित्तलवार, धनंजय वरगंटीवार यांनी सुत्रबद्ध कारवाई करण्याचे नियोजन केले. स्वत: उपविभागीय पोलीस अधिकारी व त्यांच्या चमूने सापळा रचून सोमवारी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास बोरी घाट परिसरात छापेमारी केली असता एम.एच. ३४ एबी २९६०, एम.एच. ३५ के २७२४, एम.एच.३२ क्यू ६४५१, एम.एच. ४० बी.जी.५०८० ट्रक घाटावर रेती भरून होते. तर घटनास्थळावरून काही अंतरावर आमडी वरून एक पोकलॅन्ड मशीन जप्त करण्यात आली. ट्रक, पोकलॅन्ड मशीन सोबत जप्त सामुग्रीची किमंत ५२ लाख,१८ हजार,४०० रुपये आहे. या प्रकरणात वरोरा पोलिसांनी ४ ट्रक चालक लोधी, कोटांगळे, नवघरे, घोडाम तसेच अन्य रामटेके, चांभारे, खान, कुरेशी, पिजदूरकर, ठाकरे विरुद्ध कलम ३७९, ३४ भादंवी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार दीपक खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरोरा पोलीस करीत आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी बेधडक केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.