Home क्राईम महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआय छापा 

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचं घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआय छापा 

109

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घर आणि इतर मालमत्तांवर केंद्रीय अन्वेशन विभागाने छापा टाकला आहे. मुंबईसह दहा ठिकाणी सीबीआयने धाड टाकली आहे. अखेर परमबीर सिंह यांच्या 100 कोटींच्या कथित वसुलीच्या आरोपाप्रकरणी ही कारवाई केल्याचं समजतं. त्यासोबतच देशमुख यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान अनिल देशमुख सध्या नागपूरमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे.

त्यामुळे राज्याचे विद्यामान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावर गेले आहेत. वळसे पाटील यांचा आज पुणे दौरा होता, मात्र या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला पुणे जिल्ह्याचा दौरा रद्द केला आहे. देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही महत्वाची भेट मानली जात आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा 100 कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा आरोप

काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपयांचे टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर हायकोर्टाने सीबीआयला 15 दिवसात प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाच्या चौकशीची सुरुवात सीबीआयने याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या जबाबाने केली. त्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात उल्लेख असलेल्या गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संजय पाटील यांचीही चौकशी करण्यात आली होती. मग अनिल देशमुख यांचीही चौकशी झाली होती.

हायकोर्टाने आदेशात म्हटलं होतं की, “अनिल देशमुख यांच्यावरील आरोप गंभीर आहे. अनिल देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री असल्याने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

ईडी आणि सीबीआयचा राजकीय हेतूने वापर : हसन मुश्रीफ

ईडी आणि सीबीआयचा वापर राजकीय हेतूने होत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी यांनी भाजपवर केला आहे. तसंच एका पत्रावर एवढी कारवाई होऊ शकते का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. अनिल देशमुख यातून निर्दोष सुटतील असा विश्वास आहे, असं मुश्रीफ म्हणाले. माझ्यावर देखील ईडीने कारवाई केली होती. लवकरच दूध का दूध और पानी का पानी होईल, असं मुश्रीफ यांनी म्हटलं.