Home चंद्रपूर  *केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आदित्य जीवनेच्या चमकदार कामगरीने वरोऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा*

*केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आदित्य जीवनेच्या चमकदार कामगरीने वरोऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा*

265

*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा*: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या परिक्षेत येथील कृष्णनगर टिळक वार्डच्या आदित्य चंद्रभान जीवने याने देशपातळीवर ३९९ वे स्थान पटकावून चमकदार कामगिरी केल्याने वरोऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. आदित्यच्या यशाने परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आदित्य यांनी एस.एस.सी वरोरा, एच.एस.सी नागपूर व बी ई (मॅकनिकल) ही पदवी परीक्षा यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागपूर येथून उत्तीर्ण केली होती. पदवीच्या अंतिम वर्षात असताना ओबामा फाउंडेशन, अमेरिकातर्फे मोठ्या रकमेच्या पॅकेजची ऑफर धुडकावून सनदी अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात अवघ्या काही गुणांनी हुलकावणी दिल्याने पुन्हा जोमाने अभ्यास केला. काही दिवस दिल्लीतील नामांकित ग्रंथालय व शैक्षणिक संस्थांना भेटी देऊन अभ्यासक्रमाशी निगडित माहितीच्या नोट्स काढल्या व परिश्रमपूर्वक अभ्यास केला. दुर्दम्य इच्छाशक्ती, अभ्यासात सातत्य, जिद्द, मेहनत व चिकाटी तसेच आई वडिलांचे वेळोवेळी यथोचित मार्गदर्शन याची परिणती म्हणजे हे यश होय. आदित्य यांचे वडील डॉ चंद्रभान कवडुजी जीवने हे आनंदनिकेतन महाविद्यालय, वरोरा येथे वाणिज्य अभ्यासक्रमाचे प्राध्यापक असून आई सौ प्रतिमा ह्या हायस्कूल शिक्षिका आहेत. या स्पृहणीय यशामुळे परिसरात आनंदमय वातावरण निर्माण झाले असून आदित्यसह त्यांच्या आई वडिलांवरही अभिनंदनाचा वर्षाव होत असल्याने ते अक्षरशः भारावून गेले आहेत.