शासनाची दिशाभूल व शेतकऱ्यांची फसवणूक करीत जेसीईजीएजीआयपीएल (जे व्ही ) तेलीबांधा, रायपूर छत्तीसगढ या कंपनीतर्फे वरोरा – वणी – बायपास रोडच्या कामाकरीता नियम धाब्यावर बसवून क्षमतेपेक्षा अधिक मुरुमाचे बेकायदा उत्खनन केल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. त्यामुळे सदर कंपनी विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अधिक माहितीनुसार तालुक्यातील मौजा आनंदवन येथील भूमापन क्रमांक ६७ आराजी २.१० हेक्टर आर ही जमीन विठ्ठल दामुधर उईके व इतर यांच्या खाजगी नावाने दर्ज असून कंपनीचे व्यवस्थापक आर. त्रिपाठी यांनी ही जमीन करार तत्त्वावर घेऊन त्या जागेवर सदर शेतकऱ्याला अंधारात ठेवून मुरूम उत्खननाची परवानगी घेतली असल्याचे कळते. तद्नंतर शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून, शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून क्षमतेपेक्षा अधिक मुरुमाची उचल करून त्याचा रस्तेकामासाठी वापर करण्यात आला आहे. सरकारी आकड्यांनुसार भूमापन क्रमांक ६७ मधून १३,५७० घनमीटर जागेतून ४७९५ ब्रास मुरूम उत्खनन केल्याचे सांगण्यात येत असले तरी सदर कंपनीने ५ हजार ब्रास पेक्षाही जास्त प्रमाणात मुरुमाचा उपसा केल्याचे दिसून येत आहे. राज्य महामार्गाचे रुंदीकरणाच्या कामात वापरण्यात आलेल्या अवैध मुरमाच्या उत्खननामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे.
कंपनीने उत्खननासाठी परवानगी घेतली असल्याचे सांगण्यात येत असले तरी कंपनी गरीब, गरजू, दलित आदिवासी शेतकऱ्यांना हेरून त्यांना त्याच्या शेतात शेततळे बांधून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या जमिनीतून प्रमाणापेक्षा जास्त उत्खनन करणे हे तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या उत्खननावरून दिसून येते. संबंधित शेतकऱ्याच्या जमिनीवर खोदकाम अधिक केल्याने जागेवर मोठे खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे जीवित हानी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर महामार्ग रुंदीकरण कार्यात मुरूम ऐवजी माती, अॅशचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या प्रकरणात लक्ष देण्याची मागणी होत आहे. मौजा आनंदवन भूमापन क्रमांक ६७ वर मौजा आनंदवन महसूल विभागाचे मंडळ अधिकारी यांना ही अनधिकृत उत्खनन दिसून आल्याने त्यांनीही तहसीलदार वरोरा यांच्याकडे रितसर तक्रार दिल्याचे कळते. गत एका वर्षापासून वणी – वरोरा या महामार्गाचे काम सुरू आहे. कंपनीने मुरूम व मातीसाठी ठिकाणी उत्खनन केले असल्याचेही कळते. सदर कंपनीने शेतकऱ्यांसह शासनाची दिशाभूल करून क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन केल्याने तहसीलदार मार्फत संबंधित कंपनीच्या विरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ नुसार दंडात्मक कारवाई केली जाते काय? याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.
।।वर्जन।।
मौजा आनंदवन भूमापन क्रमांक ६७ आराजी वर कंपनीने परवानगी पेक्षा अधिक उत्खनन केल्याची तक्रार दाखल होताच अथवा निदर्शनास आल्यास कंपनी विरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
*प्रशांत बेडसे (पाटील)*
तहसीलदार, वरोरा