Home चंद्रपूर  *२८ फेब्रुवारीला श्री शिवशंकराच्या मुर्तीची पुनर्स्थापना व प्राणप्रतिष्ठा*

*२८ फेब्रुवारीला श्री शिवशंकराच्या मुर्तीची पुनर्स्थापना व प्राणप्रतिष्ठा*

95
*भव्य शोभायात्रेत सहभागी व्हा – श्री महादेव मंदिर देवस्थान*
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : स्थानीय यात्रा मैदानावर स्थित महादेव मंदिर देवस्थानात नवीन भगवान श्री शिवशंकराच्या मुर्तीची स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी होणार असून तत्पूर्वी गावातून निघणाऱ्या भव्य शोभायात्रेत गावकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हॉटेल रॉयल प्लाझा येथे आयोजित पत्र परिषदेत श्री महादेव मंदिर देवस्थान ,राष्ट्रीय हिंदू एकता मंच व भगवान श्री शिवशंकर प्रेमी भाविकांनी केली आहे.
पत्र परिषदेत त्यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी समाजकंटकांनी स्थानीय आठवडी बाजार, यात्रा मैदानावर सुमारे ३५ वर्षांपूर्वी स्थापित केलेली भगवान शिवशंकराच्या मुर्तीची विटंबना करून ती खंडीत केली. त्यामुळे हिंदू समाजाची धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने याचे पडसाद तात्काळ गावात उमटले. याबाबत पोलिस स्टेशनमध्ये रितसर तक्रारही नोंदविण्यात आली. धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी स्थानीक प्रशासन व जनप्रतिनिधी यांनी मध्यस्ती केली. या प्रकरणाचे पडसाद उमटणार नाही याची दखल घेत त्याच जागेवर भगवान शिवशंकराच्या नवीन मुर्तीची स्थापना करण्याच्या निर्णय घेण्यात आला. त्यानुसार महाशिवरात्रीच्या पर्वापूर्वी म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी श्री शिवशंकराच्या मुर्तीची पुनर्स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळा सायंकाळी होऊन महाशिवरात्रीला मंदिर जनतेला पुजाअर्चा व दर्शनासाठी खुले करण्यात येईल. तत्पूर्वी २८ फेब्रुवारीला दुपारी ३.०० वाजता आठवडी बाजार , यात्रा मैदानावरून सब्जी मंडी, शुभम मंगल कार्यालय, कामगार चौक, मित्र चौक, डोंगरावर चौक, जयभारती चौक, वीर सावरकर चौक, ज्योतिबा फुले चौक, डॉ. आंबेडकर चौक, नेहरू चौक, हनुमान मंदिर ( मोठे), या मार्गावरून परत सब्जी मंडी अशी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. सर्व हिंदू समाज बांधवांनी व तालुक्यातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री महादेव मंदिर देवस्थान व भगवान श्री शिवशंकर प्रेमी भाविकांनी केले आहे.