*वरोरा* : बाबा आमटे यांनी म. गांधी यांच्यापासून प्रेरणा घेत शहरातील नागरिकांचे मलमूत्र साफ करणाऱ्या सफाई कामगारांमध्ये परमेश्वर अनुभवून त्या समाजाच्या उत्कर्षासाठी संघटना बनविली होती.त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन गांधीजींनी त्यांना ‘ भंगीयोंका बादशहा ‘ असे संबोधले होते, अशी माहिती महारोगी सेवा समितीचे सचिव व ज्येष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांनी येथे दिली. आनंदवन मित्र मंडळ, वरोरा तर्फे नगर परिषदेच्या गांधी उद्यानात बाबा आमटे यांच्या सात दशकातील कार्याचा आढावा घेणाऱ्या दोन दिवसीय चित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी ( भापोसे ), स्व. श्रीनिवासराव शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.चे माजी अध्यक्ष तथा संचालक रवींद्र शिंदे, लातूरचे माजी प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र सचिव माधव बावगे, पारस ऍग्रोचे संचालक अमोल मुथा, बांबू आर्ट डिझायनर मिनाक्षी वाळके प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. आमटे म्हणाले की, बाबा आमटे हे चमत्कार करणारे बाबा नव्हते तर त्यांची आई त्यांना लाडाने ‘ बाबा ‘ म्हणायची म्हणून ते नाव प्रचलित झाले. ते म्हणाले की, बांबानी शुन्यातून विश्व निर्माण केले. त्यांनी आपलं चरित्र लिहिलं नाही. मागे वळून पाहण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता. त्यांनी आनंदवनात स्मारक उभारू दिले नाही. अजूनही अनेक कायदे कुष्ठरुग्णांच्या विकासासाठी अडचणींचे ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. वरोऱ्यातील अनेक जुन्या स्मृतींना उजाळा देत आनंदवन मित्र मंडळाच्या उपक्रमांची त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
डॉ. सोमनाथ रोडे यांनी बाबांच्या जीवनाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. वरोऱ्यात बाबा आमटे यांचे स्मारक बनावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
नगराध्यक्ष अली म्हणाले की, देशात, जगात वरोरा शहराची ओळख ही बाबा आमटे व आनंदवन यामुळेच आहे.
शिंदे उद्घाटनपर भाषणात म्हणाले की, बाबांनी कुष्ठरुग्णांना न केवळ आधार दिला तर
त्यांच्यात जीवन जगण्याचा आत्मविश्वास निर्माण करुन आनंदवनाची निर्मिती केली.
यावेळी बावगे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात कोरोना मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रवी शिंदे, तरुण उद्योजक अमोल मुथा, न.प. मध्ये मागील अनेक वर्षांपासून इमानेइतबारे पाणीपुरवठा करणाऱ्या मडावी यांचा शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला तसेच बांबू आर्ट डिझायनर मिनाक्षी वाळके, नगराध्यक्ष म्हणून ५ वर्षे पूर्ण करणाऱ्या अहेतेशाम अली व जेष्ठ समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सुरुवातीला मान्यवरांनी दीपप्रज्वल केले. तदनंतर श्रद्धेय बाबा आमटे यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले.
स्वरानंदवनच्या टीमने संत तुकडोजी महाराज यांची ‘ *सबके लिये खुला है मंदिर ये हमारा* ‘ व ‘ *हर देश में तू, हर भेष में तू* ‘ अशी भजने सादर केली.
यावेळी महारोगी सेवा समिती आनंदवनचे विश्वस्त डॉ. विजय पोळ, सुधाकर कडू, सदाशिवराव ताजने, सामाजिक कार्यकर्ते मारोतराव मगरे, दिनेश पारेख, प्रवीण सुराणा, दादा जयस्वाल, मोहन रंगदड, विवेक बर्वे, रिषभ रट्टे, पत्रकार बाळू भोयर, प्रदीप कोहपरे, प्रवीण गंधारे, चेतन लुतडे, युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख आलेख रट्टे, आनंदवनचे कार्यकर्ते दीपक शिव, राजेश ताजने, रवींद्र नलगिंटवार, रोहीत फरताडे, शौकत खान, विजय पिल्लेवान, साबिया खान, अविनाश कुळसंगे, न.प.चे इंजि. शशीकांत दलाल, उमेश ब्राम्हणे, स्वरानंदवनाचे कलाकार तथा शहरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन आनंदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर यांनी केले. आभार मंडळाचे सचिव राजेंद्र मर्दाने यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे डॉ. वाय.एस. जाधव, बंडू देऊळकर, राहुल देवडे, शाहीद अख्तर, प्रा. बळवंत शेलवटकर, शरद नन्नावरे, संजय गांधी, शाम ठेंगडी, भास्कर गोल्हर, बागडे, तूषार मर्दाने इ.नी. अथक परिश्रम घेतले.