Home चंद्रपूर  *पुरोगामी विचारसरणी रुजविणारे रविदास हे संतांचे ध्रुवतारा*

*पुरोगामी विचारसरणी रुजविणारे रविदास हे संतांचे ध्रुवतारा*

92
*राजेंद्र मर्दाने*
*वरोरा* : स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व मानवतावादाचा पुरस्कार करून आपल्या अमृतवाणीने पुरोगामी विचारसरणी जनमानसात रुजविणारे संत रविदास हे खऱ्या अर्थाने संतांचे ध्रुवतारा होते, असे मार्मिक प्रतिपादन ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा आनंदवन मित्र मंडळाचे सचिव राजेंद्र मर्दाने यांनी येथे केले. ओशनिक बहुउद्देशीय संस्था, आनंदवन मित्र मंडळ व आनंदम् मैत्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामीकृपा भवनात संत शिरोमणी रविदास यांची जयंती सोत्साह साजरी करण्यात आली.त्यावेळी प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अभियंता अजय बन्सोडे हे होते.
कार्यक्रमात आनंदम् चे महाराष्ट्र समन्वयक डॉ. वाय. एस. जाधव, आनंदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर, रोटरी क्लब, वरोरा अध्यक्ष बंडूभाऊ देऊळकर, अभियंता आकाश खातरकर, आनंदम् मैत्री संघाच्या वरोरा संयोजिका संगीता गोल्हर, ज्येष्ठ नागरिक उत्तम भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.
मर्दाने पुढे म्हणाले की, त्यावेळी स्पृश्य – अस्पृश्य भेद पराकोटीला असताना स्वतःला ‘ चमार ‘ म्हणून बिनधास्तपणे उद्धोषित करणारे रविदास एक धाडसी व्यक्तिमत्व होते. त्यांनी विषमतावादी व्यवस्था नष्ट करण्यासाठी देशभर भ्रमण करीत जनतेला जागृत केले. त्यांच्या अमृतवाणीने जनमानसात अक्षरशः मोहनी टाकल्याने लक्षावधी स्त्री-पुरुष त्यांचे शिष्य झाले. त्यात चित्तोड राजघराण्यातील राणी मीराबाई, राणी झाली, पीपाजी महाराज, सपना वीर, दिल्लीचे सुलतान सिकंदर शहा लोधी आदींचा समावेश होता. रविदास यांच्या पुरोगामी विचारांचा कित्ता म. फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गिरविला.आचार्य रजनीश यांनीही संत रविदास यांच्या अलौकिक विचारांचा परामर्श घेत विपुल लेखन केल्याचे सोदाहरण पटवून देत चिकित्सक दृष्टीकोनातून त्याच्या अवलोकनाची आज गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शीख धर्माच्या’ गुरु ग्रंथ साहेब ‘ या धर्मग्रंथात मध्ये गुरू रविदास यांची ४० पदे आहेत असे नमूद करीत १२० वर्षांचे दीर्घायुष्य लाभलेल्या रविदासांचे राजस्थानातील चित्तोड येथे महानिर्वाण झाल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात अभियंता बन्सोडे म्हणाले की, यापूर्वी संत रविदास यांच्याबद्दल खूप काही ऐकलं होतं परंतु त्यांच्या कार्याच्या महतीचे विविध पैलू या कार्यक्रमातून व प्रमुख वक्त्याच्या मार्गदर्शनातून कळले.
डॉ. जाधव म्हणाले की, सामाजिक क्रांतीचे प्रणेते संत रविदास मानवतावाद बुद्धिवाद, बंधुता व न्याय यांचे प्रतीक होते.
प्रास्ताविकात आनंदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर म्हणाले की, भक्ती संप्रदायातील एक महान संत म्हणून संत रविदास यांची ओळख आहे. आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनकल्याण व सामाजिक विषमता दूर करण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची विस्तृतपणे माहिती मिळाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी संत शिरोमणी रविदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले व दीपप्रज्वलन केले.
सूत्रसंचालन डॉ. मुधोळकर यांनी केले तर आभार राहुल देवडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री भास्कर गोल्हर, संजय गांधी, ओंकेश्वर टिपले, रोशन बहादे, शरद नन्नावरे, प्रा. बी.आर. शेलवटकर, शाहिद अख्तर, अनिरुद्ध मुधोळकर राहुल मेश्राम इ. नी परिश्रम घेतले. शेवटी मिठाई वाटून कार्यक्रमाची सांगता झाली.