Home चंद्रपूर  *शहीद जवानांना वरोरावासियांची कँडल मार्चद्वारे भावपूर्ण आदरांजली*

*शहीद जवानांना वरोरावासियांची कँडल मार्चद्वारे भावपूर्ण आदरांजली*

88

*राजेंद्र मर्दाने*

*वरोरा*: – जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील अवांतीपुरा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीवर ‘ जैश -ए – मोहम्मद ‘ या आतंकवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या 44 भारतीय जवानांना वरोरा वासियांतर्फे कॅन्डल मार्च काढून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली. कॅन्डल मार्चच्या सुरुवातीला एअर बोर्न ट्रेनिंग स्कूलचे प्रशिक्षणार्थी, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देत मेणबत्ती प्रज्वलित करून शहीद जवानांना नमन करीत श्रद्धांजली अर्पण केली. तिथूनच ‘ कँडल मार्च ‘ काढण्यात आला. सदर ‘ कँडल मार्च ‘ डॉ. आंबेडकर चौक, जुनी नगरपालिका, वरोरा उपजिल्हा रुग्णालय मार्गे निघून शहीद योगेश डाहूले स्मारकाजवळ थांबला. यावेळी शहीद स्मारकावर शहरातील मान्यवरांनी मेणबत्ती प्रज्वलित करुन आदरांजली वाहिली. यात माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश बोभाटे, सागर कोहळे, ऋषी मडावी, रवि चरूरकर, प्रवीण चिमूरकर, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार राजेंद्र मर्दाने, प्रवीण गंधारे, यश साखरकर, आकाश भोयर, दौलत ढोके, अनिल पिसे, सानू आवारी, तपस्या धवने, वेदिका भोयर प्रामुख्याने उपस्थित होते.
शेवटी,शहीद जवानांना उपस्थितांनी दोन मिनिटे मौन बाळगून श्रद्धांजली दिली.’ वंदे मातरम ‘ ; ‘ शहीद जवान अमर रहे ‘; ‘ भारत माता की जय ‘, अशा घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. यावेळी माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.