Home चंद्रपूर  शेगांव ठाण्यातील पोलीस कर्मचारी डुकरे यांची अखेर बदली

शेगांव ठाण्यातील पोलीस कर्मचारी डुकरे यांची अखेर बदली

90

*खानगांव ग्रा.पं. सदस्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले होते निवेदन*

*वरोरा* : तालुक्यातील शेगांव (बु.) पोलीस ठाण्यातील वादग्रस्त पोलीस अंमलदार देवानंद डुकरे यांची अखेर चंद्रपूर पोलीस मुख्यालयात बदली झाल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.
अधिक माहिती नुसार आर्थिक व्यवहार करुन पोलिसांची प्रतिमा मलीन केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने यापूर्वी निलंबित व तालुक्यातील शेगांव ( बु.) पोलीस ठाण्यात कार्यरत देवानंद उर्फ देवा डुकरे यांच्या विरोधातील तक्रारी दिवसेंदिवस वाढत होत्या. तक्रारीनंतर ही शेगांव पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी दखल न घेतल्याने संतप्त खानगांव ग्राम पंचायत क्षेत्रातील महिला सदस्यांनी सरपंच अखेर जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी यांची अर्चना रामटेके यांच्या नेतृत्वाखाली भेट घेऊन त्यांना आपबिती सांगितली व निवेदनाद्वारे संबंधित कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी केली होती.
पोलीस अधीक्षकांनी याबाबत व एकूणच प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी, चिमूर यांच्याकडे देऊन ही बाब गांभीर्याने घेऊन सविस्तर अहवाल सादर करा, असेही अधीक्षकांनी निर्देश केले. या प्रकरणात निश्चितच आवश्यक कार्यवाही करण्याची आश्वासन पोलीस अधीक्षक परदेशी यांनी शिष्टमंडळाला दिले होते.
पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार याबाबत चौकशी नंतर अखेर देवानंद डुकरे यांची पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथे बदली करण्यात आली
व त्यांना शेगांव ठाण्यातून कार्यमुक्त करण्यात आले आहे. देवानंद डुकरे यांचेवर निलंबनाची कार्यवाही करण्याची मागणी असताना त्यांची बदली करण्यात आली. तक्रारकर्त्यांनी या बदलीतही समाधान व्यक्त केला. डुकरेच्या बदलीनंतर परिसरातील लोकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असून जिल्हा अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, चिमूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांचे आभार मानले.
शिष्टमंडळात उपसरपंच अरुण राजनहिरे (गुजगव्हाण), सदस्य हिराबाई दडमल (खानगांव), मंदाबाई शनवारे, किशोर हनवते ( निमढेला) सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र रामटेके आदींचा समावेश होता.